
भारताचा सांस्कृतिक परंपरंचा आलेख प्रचंड मोठा आहे. तसेच प्रत्येक प्रांताची एक वेगळी ओळख आहे तेथील देवता, परंपरा, प्रथा, जाती व्यवस्था, त्याचं समाजाप्रती योगदान, आणि तेथील लोकसंस्कृती हे सर्वच अभ्यास करण्यासारखे आहे.
भारतात साधारण बघता प्रत्येक महिन्यात एक उत्सव असतोच आणि त्याच्या आजूबाजूला भरणाऱ्या जत्रा, कुंभ, यात्रा, उरूस आणि उत्सव ह्याचे प्रमाण मोठे आहे. भारतात मोठे सण जसे दिवाळी, नवरात्र, गणेशोत्सव, रक्षाबंधन, आणि इतर धार्मिक उत्सव मोठ्या प्रमाणे साजरे केले जातात. प्रथा वेगळ्या असतील नाव वेगळे असेल, घरातील प्रसादाची योजना, पूजेचं मांडणी वेगळी असेल. परंतु उद्देश्य सारखाचं असतो तसेच त्या त्या प्रांतात, जिल्ह्यात किंवा गावात एखादी देवता अशी असतेच की तिची जत्रा भरवली जाते. पूर्ण भारताचा अभ्यास हा विषय इथे नाही. आपण महाराष्ट्रातील जत्रा हा विषय प्रामुख्याने अभ्यासासाठी निवडला
आहे.
महाराष्ट्राचा विचार करताना दहा हजार पेक्षा अधिक यात्रा, जत्रा, उरूस असतील. छत्रपती शिवाजी महाराज ह्यांच्या काळातील, त्याच्या आधीच्या पर्वातील जत्रा, त्यांची लोकजागृतीसाठी असलेली कारणे वेगळी असतील, परंतु अजूनही ती परंपरा टिकवून ठेवणार समाजमन आहे. कदाचित आशय, विषय बदलतील, आर्थिक उलाढाल बदलतील परंतु लोकसाहित्य तेच राहते. ह्या अभ्यासाच्या निमित्ताने त्याचा अभ्यास होईल. लोकसाहित्य म्हणजे काय तर फक्त सण, उत्सव, परंपरा असे मर्यादित विषय नसून अस्तित्व, स्वाभिमान आणि परंपरेच्या रक्षणासाठी अराष्ट्रीय शक्तींशी केलेल्या संघर्षाचा देखील अभ्यास ठरतो. जत्रांचा अभ्यास करताना त्यातील अनेक विषयांचा अभ्यास आवश्यक ठरतो. लोकसाहित्य, लोक संस्कृती, त्यामागील इतिहास असाही एक विषय ह्या अभ्यासामागे आहे. विविध जातीजमाती त्यामागील त्यांचे पारंपारिक व्यवसाय आणि आता प्रचलित झालेले त्यांचे व्यवसाय असा सगळा अभ्यास ह्यामध्ये येतो. प्रत्येक जातीचे व्यवसाय, त्यांची पार्श्वभूमी, मानसिक घडण कशा स्वरुपाची आणि त्यांचा अभ्यास करून त्यांचे प्रश्न समजून घेणे, उपाययोजना ह्यावर असा एक वेगळा अभ्यास आहे.
शेतीची कामे करताना म्हणण्यात येणारी गाणी, किंवा कोणताही उत्सव साजरा करताना त्यामध्ये असलेली प्रचलित गाणी, ओव्या, गणगौळण, किंवा इतर स्वरूपातील उपलब्ध साहित्य असा एक अभ्यासाचा विचारह्यामध्ये आहे. तसाच एक विषय समाजव्यवस्था समजावून घेण्याचा आहे. गावगाडा ही एक प्रमुख भारतीय समाजव्यवस्था आहे. बलुतेदार, अलुतेदार आणि अन्य मानकरी मिळून ही व्यवस्था निर्माण झाली. या व्यवस्थेला समांतर व्यवस्था गावगाड्यात अंतर्भूत नसणाऱ्या जमातींची होती. कैकाडी, कोल्हाटी, बहुरूपी/रायरंद, डक्क्लवार अशा कित्येक जमातींचा यात समावेश होतो. या व्यवस्थांचे वर्तमान स्वरूप वेगळे असले तरी यांचा इतिहास अत्यंत उज्ज्वल आहे. विविध कला आणि विद्यांमध्ये निपुण असणाऱ्या या जमाती समाजव्यवस्थेचा भक्कम आधार म्हणून लोकपरंपरेत बघितल्या गेल्या आहेत. जत्रेच्या निमित्ताने या सर्व जमाती एकत्र येतात, आपल्या आपल्या कला आणि खेळांचे सादरीकरण करतात. त्यांचाही अभ्यास जत्रेच्या निमित्ताने होऊ शकतो.
कोणतीही गोष्ट शिकायची तर त्याचा प्रत्यक्ष अनुभव घेणे आवश्यक असतो. तसेच जत्रा हा विषय आहे. जत्रेमध्ये फिरताना अनेक मौखिक वाङ्मयची परंपरा, लोक परंपरेतील स्त्री प्रतिमा, गाणी, लोकगीते, लोकमानस, भाकिते, लोकरंगभूमी, लोकरंगधारा, अभिजात रंगभूमी, लोक चित्रकला, लोक परंपरेतील खेळ, सामाजिक परिवर्तन असे विविध विषय आहेत.
मौखिक वाङ्मयाची परंपरा – मौखिक परंपरा म्हणजे अनेक गोष्टी, गाणी, कथा ज्या त्या देवते भोवती अथवा जत्रा सुरू करण्याच्या कथा. काळाच्या ओघात बदलते समाज मानस आणि पर्यायाने बदलत्या मौखिक परंपरा. त्यातील स्त्री साहित्य असे वेगळे अभ्यास करणे योग्य ठरेल. लोक साहित्यातील स्त्री प्रतिमा – आई हे नाते सगळ्यात मोठे असते आणि त्याविषयी अनेक ओव्या, कविता, लेख लिहिले गेले. तिच्या जोडीने येणारी अनेक नाती, त्याला अनुसरून येणाऱ्या कविता, ओव्या, अभंग ह्याचा अभ्यासही तेवढाच आवश्यक आहे. काही मौखिक गोष्टी जशा रामाच्या, कृष्णेच्या, राधेच्या, हनुमानाच्या अशा अनेक कथा आहेत. त्याचा अभ्यास, लोकांच्या तोंडी असलेल्या कथा, असे बरेच विषय अभ्यासता येतील.
लोकमानस – लोक म्हणजे संपूर्ण मानव समूह आणि लोकमानस म्हणजे समूहाचा विचार. प्रत्येक प्रांताचा वेगळा पेहराव, भाषा, चालीरीती भिन्न असल्या तरी संस्कृतीचा गाभा सगळीकडे सारखा असतो. हा संस्कृतीचा गाभा म्हणजे समूहाचा विचार किंवा लोकमानस. हे लोकमानस व्यक्त होण्याच्या अनेक पद्धती असतात. रूढी, परंपरा, सण-उत्सव यांचा यामध्ये समावेश होतो. शिवाय भटक्या आणि स्थायिक जाती-जमाती, त्यांच्या विशिष्ट परंपरा, जात पंचायती आणि त्यातून घडत जाणारे लोकमानस हा संबंध समजून घेणे देखील आवश्यक आहे.
भाकिते – भाकिते म्हणजे अनुमान वर्तवण्याच्या पद्धती. भारतामध्ये अंक, श्लोक, अक्षरे, ग्रह, तारे, चंद्र, सूर्य, नक्षत्र अशांवर आधारित अनुमान सांगण्याची पद्धती आहे. त्यातही अनेक पद्धती जशा प्रचलित ज्योतिष विद्या, प्रश्न ज्योतिष, नाडी ग्रंथ, हस्त मुद्रिका, लोक ज्योतिष, गुढविद्या, सामुद्रिक शास्त्र, आणि निसर्गावरून काही भाकिते, पशु पक्षी ह्यांच्या हालचालींवर, स्वप्न, शकून ह्यावर सुद्धा अनेक भाकिते नोंदवली जातात. जत्रेत ही भाकिते वर्तविणारी मंडळी उपस्थित असतात. या अभ्यासाच्या निमित्ताने भाकिते वर्तविण्याच्या शैलींचा अभ्यास, त्यातील तज्ञ लोक, गावातील लोकांच्या भाकिते आणि ते वर्तविणाऱ्या विषयीची श्रद्धा इ. विषयांचा अभ्यास यात होऊ शकतो. त्याचा एक वेगळा अभ्यास म्हणजे किती पद्धती आहेत, काय श्रद्धा, अंधश्रद्धा असे सगळे ह्यातून पाहता येईल.
लोकरंगभूमी – किती विषय ह्यात सामावलेले असतील ह्याच अभ्यास म्हणजे आनंदाचा विषय आहे. ह्याचाअभ्यास करताना लोक परंपरेतील नाट्य तत्व समजून घ्याला हवे, देवतांच्या गोष्टी, आदिवासी परंपरा, त्यातील नृत्य, लोक परंपरेतील नाटके, असे अनेक विषय आहेत. याशिवाय काही भक्तिपर कृती देखील नाट्ययुक्त असल्याचे दिसून येते. जसे – गोंधळ, दशावतार, बोहाडा, भवई, इ. या परंपरांचा अभ्यास करत असतांना नाटक म्हणजे काय, त्यामधील नाट्य आणि सत्यता कशी बघावी अशा विषयांचा विचार करता येईल. याच साखळीत पुढे प्रायोगिक रंगभूमीचा उगम झालेला दिसतो. उदा. हयवदन.
लोक परंपरेतील खेळ – खेळाचे अनेक प्रकार आहेत. अनेक खेळांचा आणि सण, उत्सव ह्यांचा संबंध जोडला आहे. महिलांचे अनेक सण खेळ खेळून साजरे केले जातात. सामुहिक, खेळ, मैदानी खेळ, एकल खेळ, पशु- पक्ष्यांचे खेळ असे अनेक प्रकार असतात. उदा. बैलगाड्यांची शर्यत, कोंबड्यांची झुंज, फुगड्या, फेर, इ. लोक परंपरा आणि सामाजिक परिवर्तन – आधुनिकी कारणाने अनेक परंपरा बदलत गेल्या. शाश्वत विकासाकडे ह्या सगळ्याचा कसा परिणाम होतो, शेती आधारित असलेली जत्रेची परंपरा बदलेली आहे का ह्याचा अभ्यास करणे हेही एक विषय होऊ शकतो.
क्षेत्रभेटीपूर्व तयारी (Pre-Field Preparation)
(अ) संदर्भ समजून घ्या
इतिहास व सांस्कृतिक महत्त्वाचा अभ्यास
जत्रा केवळ धार्मिक विधी नसून त्या सामाजिक, आर्थिक व सांस्कृतिक देवाणघेवाणीचे केंद्र असतात. उदाहरणार्थ, पंढरपूर यात्रा संत परंपरेशी जोडलेली आहे, तर शिर्डीची जत्रा साईबाबांच्या भक्ती परंपरेवर आधारित आहे.
अभ्यास करताना –
- प्राचीन व मध्ययुगीन काळातील जत्रांचे उल्लेख (भक्ती चळवळ, संत साहित्य)
- ब्रिटीश काळातील जिल्हा गॅझेटिअरमधील जत्रा संदर्भ
- आधुनिक काळातील बदल (पर्यटन, व्यावसायीकरण)
प्रादेशिक वैशिष्ट्ये
(ब) स्थानिक भाषेचा परिचय
मराठी तसेच स्थानिक बोलीभाषा (उदा. कोकणी, वरहाडी, अहिराणी) यांचा अभ्यास करा. स्थानिक वाक्यरचना, अभिवादन पद्धती आणि धार्मिक संज्ञा लक्षात ठेवा. उदाहरण: “मानाचा हंडा”, “नवस फेडणे”, “वारी” यांसारख्या शब्दांचा अर्थ आधीच समजून घ्या.
(क) मुख्य स्थळे व दिनदर्शिका ओळखा
महाराष्ट्र पर्यटन महामंडळ, जिल्हा प्रशासन व देवस्थानांची अधिकृत संकेतस्थळे तपासा. स्थानिक वृत्तपत्रातील जत्रा-जाहिराती, पाट्या, गावकरी सांगणाऱ्या तारखा लिहून ठेवा. उदाहरण: पंढरपूर आषाढी वारी, देवी महालक्ष्मीची कोल्हापूर यात्रा, श्री क्षेत्र गोकुळातील गोपाळकाला.
(ड) स्थानिक संपर्क व परवानगी
गावातील सरपंच, देवस्थान समिती, उत्सव प्रमुख, आणि स्थानिक शिक्षक किंवा पत्रकार यांच्याशी संपर्क साधा.
२. क्षेत्रभेटीदरम्यान (During Fieldwork)
(अ) विविध कार्यक्रमांना उपस्थित रहा
केवळ एकाच जत्रेवर थांबू नका; लहान गावातील, मोठ्या शहरातील, तसेच उरूस व भजनमंडळींचे कार्यक्रम पहा.
उदाहरण: भंडाऱ्याची पिवळी उधळण (माळशेज घाट परिसरातील जत्रा)
नृत्य-नाटिका (गोंधळ, दशावतार)
उंट, घोड्यांचे मेळे (वाशिम, जळगाव)
(ब) मानवीशास्त्रीय निरीक्षण (Ethnographic Observation)
- आयोजन – तंबू, पाणीपुरवठा, वीज, स्टेज, पोलिस बंदोबस्त, आरोग्य सुविधा.
- कला – वेशभूषा, वाद्ये, रंगसंगती, प्रकाशयोजना.
- प्रेक्षक – कोणत्या वयोगटातील, कुठून आलेले, सहभागाचा प्रकार.
उदाहरण: पंढरपूर वारीतील दिंडी, पायघड्या, अभंगगायन.
(क) मुलाखती
- कलाकार – त्यांचे प्रशिक्षण, गुरू, परंपरा, अडचणी.
- आयोजक – निधी, व्यवस्थापन, शासनाचा सहभाग.
- भाविक/प्रेक्षक – का येतात, कोणत्या गोष्टी महत्त्वाच्या वाटतात.
- प्रश्न अर्ध-संरचित ठेवा, जेणेकरून व्यक्ती मोकळेपणाने बोलेल.
(ड) ध्वनी-चित्र दस्तऐवजीकरण
- छायाचित्रण करताना व्यक्तीची परवानगी घ्या.
- महत्त्वाच्या क्षणांचे (उदा. पालखीची आगमन, आरती) व्हिडिओ तयार करा.
- रंग, प्रकाश, आवाज यांची सविस्तर नोंद ठेवा.
(ई) सन्मानपूर्वक सहभाग
भाविकांसोबत आरती, कीर्तन, वारीत चालणे अशा प्रकारे सहभागी व्हा.
प्रत्यक्ष अनुभवातून सांस्कृतिक जाण अधिक सखोल होते.
३. क्षेत्रभेटीनंतरचे विश्लेषण (Post-Field Analysis)
(अ) माहितीची पडताळणी
निरीक्षण, मुलाखती, आणि वाचलेल्या साहित्याची तुलना करा.
उदाहरण: पूर्वीच्या साहित्यामध्ये नोंदवलेले विधी आजही तसेच आहेत का? काही बदल झाले आहेत का?
(ब) निष्कर्षाचा संदर्भ
जत्रा समाजातील एकोपा, धार्मिक श्रद्धा, स्थानिक अर्थव्यवस्था, आणि सांस्कृतिक वारशात कशा प्रकारे महत्त्वाच्या
आहेत हे स्पष्ट करा.
(क) निष्कर्ष सादरीकरण
स्थानिक समुदायास समजेल अशा भाषेत (मराठीत) संक्षेप द्या.
शक्य असल्यास फोटो प्रदर्शनी किंवा माहिती सत्र आयोजित करा.
४. नैतिक बाबी (Ethical Considerations)
(अ) अमूर्त वारशाचा सन्मान
जत्रेचे व्यावसायीकरण टाळा.
धार्मिक विधींचे अवमूल्यन होईल अशी भाषा वा चित्रण करू नका.
(ब) संमती व गोपनीयता
ध्वनी-चित्रांसाठी लेखी/मौखिक परवानगी घ्या.
नाव न छापण्याची विनंती असेल तर ती पाळा.
(क) व्यत्यय टाळा
विधी दरम्यान शांत राहा, फोटोग्राफी करताना फ्लॅश बंद ठेवा.
५. शिफारस केलेले स्रोत (Recommended Resources)
(अ) महत्त्वाचे ग्रंथ
“महाराष्ट्रातील लोकनाट्य” – डॉ. शंकर शिंदे
“वारकरी संप्रदाय आणि पंढरपूर यात्रा” – डॉ. रा. चिं. ढेरे
जिल्हा गॅझेटिअर – कोल्हापूर, सातारा, विदर्भ
(ब) स्थानिक तज्ज्ञ
लोककला संशोधक, मराठी विद्यापीठांचे प्राध्यापक, लोकसाहित्यकार.
(क) भाषिक सहाय्य
मराठी बोलीभाषेत निपुण स्थानिक मार्गदर्शक.