जनजाती समाजाच्या अभ्यासाची आवश्यकता का आहे? सामाजिक शास्त्रांचा अभ्यास का आवश्यक आहे?

Shodhsetu    01-Sep-2025
Total Views |

janjati


सामाजिक शास्त्रांचा अभ्यास करताना समाजात अस्तित्वात असलेले प्रवाह, विचार, संस्कृती,राहणीमान या सर्वांनाच समाजमनावर होणारा एकत्रित परिणाम, समाजाचा इतिहास, विकसित झालेली जीवनशैली, पद्धती, रूढी, परंपरा, श्रद्धा,भावभावना इ. सर्वांचा विचार ओघाने येतो. व्यक्तीला, व्यक्तींच्या समूहाला स्वतंत्रपणे समजून घेता येत नाही. तर एक मोठी पार्श्वभूमी त्याला असते. ती पार्श्वभूमी, इतिहास जाणून घेतल्याशिवाय त्या समाजास काही मदत करायची असेल, नवी सुधारणा रुजवायची असेल तरी प्रथमत: सामाजिक अध्ययन अत्यावश्यक आहे. एखादा नवीन कायदा जरी आणायचा असेल तरी एक तज्ञांची समिती असते. ती अभ्यास करून एक मसुदा तयार करते. तो मसुदा जनसामान्यांच्या समोर विचारार्थ ठेवते. त्यावर मते मागवली जातात. त्या सर्वांचा विचार करून मगच तो मसुदा पूर्ण होतो आणि कायद्याचे रूप देण्यासाठी पुढे पाठवला जातो. म्हणजे हे एक प्रकारचे सर्वेक्षणच असते. हे झाले मोठ्या पातळीवरचे सर्वेक्षण. सर्वसाधारण शहरी भागात आपल्याला आपल्या घरातील उदाहरण सांगता येते की, घरातील कोणतीही वस्तू विकत घ्यायची असेल अथवा निर्णय घ्यायचा असेल तर आपण चर्चा, मित्रपरिवारात बोलून, मते घेऊन मग निर्णय घेतो. अगदी सोप्या शब्दात सांगायचे तर हे एक प्रकारचे संशोधन असते.
 
सामाजिक स्वरूपाचा अभ्यास दोन प्रकारे करता येतो -

1. सामाजिक शास्त्रांचा अभ्यास करताना केवळ वर्गात बसून एखाद्या समाजाचे विविध पैलू, प्रश्नांची केवळ पुस्तकी माहिती घेणे व त्यावर अभ्यास करणे हे योग्य नाही. पुस्तकातील माहिती ही सैद्धांतिक स्वरुपाची असते. (कधीकधी ती एका विचारसरणीकडे झुकलेला असतो)
 
2. प्रत्यक्ष समाजात जाऊन, मिसळून, त्यांच्याकडून अनेकविध गोष्टी जाणून घेणे, समस्यांवर तोडगा कसा व काय काढायचा याची चर्चा करणे आवश्यक असते. त्या त्या समाजात चालू असलेल्या, घडत असलेल्या घडामोडींचा अभ्यासही आवश्यक असतो. हा अभ्यास आपण एखादी प्रश्नावली तयार करून सर्वेक्षण पद्धतीने, काही वेळा गटचर्चा, गप्पा यामधूनही करू शकतो. काहीवेळा निरीक्षणे करून त्यातूनही माहिती मिळवू शकतो. पण यासाठी प्रत्यक्ष समाजात जाणे, भेटणे, मुलाखती घेणे आवश्यक असते. हे सगळे सामाजिक शास्त्रांच्या अभ्यासाला पूरक असते.
 
या अध्ययनासाठी काही अध्ययनपद्धती विकसित झाल्या आहेत. त्यांच्या मदतीने आपण अध्ययन केले तर ते अधिक शास्त्रशुद्ध आणि Authentic होऊ शकते. एखाद्या वेळी हे अध्ययन मोठ्या अभ्यासाचा पायाही ठरू शकते.


janjati

जनजाती भागातील संशोधनाची आवश्यकता

याप्रमाणेच जनजाती समाजातील विविध गोष्टींचा म्हणजे त्यांच्या शारीरिक, मानसिक आरोग्याचा, पारंपरिक ज्ञानाचा, शेतीच्या पद्धतीचा, त्यांच्यापर्यंत कोणत्या शासकीय योजना पोहोचल्या आहेत, त्यांच्या जीवनशैलीचा अभ्यास करणे का आवश्यक आहे ते समजून घेऊया.
 
भारतात विविध भाषा, विविध भौगोलिक स्थिती, त्यानुसारचे राहणीमान आढळते. इतकी विविधता जरी असली तरी पूर्ण देशात कुठेही कानाकोपऱ्यात गेले तरी संस्कृतीचा एक समान धागा सर्वत्र आढळतो. विविध देवतांची पूजा करणाऱ्या आपल्या समाजाचे मूळ तत्त्वज्ञान मात्र एकच आहे.
 
भारतीय समाज हा शहरी, ग्रामीण, निमशहरी आणि डोंगर दऱ्यात राहणारा जनजाती अशा गटात विभागला आहे.
 
एकूण लोकसंख्येच्या ८% समाज हा जनजाती आहे (जनगणना २०११). जो दूर डोंगर दऱ्यात राहतो. अत्यंत दुर्गम प्रदेशात राहणारा हा समाज निसर्गाच्या अधिक जवळ आहे. शहरातील चकचकाट, बदललेली जीवनशैली या समाजाला आता कुठे परिचित होऊ लागली आहे. गेल्या दहा वर्षात झालेले बदल हळूहळू त्यांच्यापर्यंतही पोहोचू लागलेत.
 
संविधानाने दिलेल्या आरक्षणाचा फायदा या समाजातील काही बांधवानी घेतला आहे. त्यामुळे थोडी परिस्थिती बदलली आहे. पण अजून खूप मोठा पल्ला गाठायचा आहे.
 
महाराष्ट्रात जनजाती समाजाच्या एकूण ४७ जमाती आहेत. त्यात गोंड, भिल्ल, कातकरी, कोरकू, महादेव कोळी, वारली, कोकणा, कोलम, पावरा इ. या सगळ्या जमातींची स्वतःची वेगळी अशी भाषा, बोली, पारंपरिक पोशाख, खेळ, नृत्य, चालीरीती, न्यायदान पद्धती, विवाह पद्धती आहेत. पारंपरिक औषधी वनस्पती, शेती, पारंपरिक ज्ञानाचे भांडार आहे. पारंपरिक व्यवसाय आहेत.
 
त्यांच्या या जीवन पद्धतीचा, ज्ञानाचा, माहितीचा अभ्यास करणे महत्त्वाचे आहे. पारंपरिक पद्धतीने शेती करून त्यांनी जे परंपरागत बी-बियाणे जपून ठेवली आहेत. ज्यातून मिळणारे पिक अतिशय पौष्टिक आहे. ज्यामुळे आपण आधुनिक जीवन शैलीच्या आजारांपासून दूर राहू शकतो त्याविषयी माहिती घेणे आवश्यक आहे. अनेक औषधी वनस्पतींची त्यांना जी माहिती आहे, ज्या वनस्पतींमध्ये अनेक आजार बरे करण्याची क्षमता आहे त्याचा फायदा समाजाला होऊ शकतो. निसर्गात होणाऱ्या बदलांची नोंद ठेवण्याची त्यांची खास शैली आहे त्याचाही अभ्यास होऊ शकतो.
 
हे जरी असले तरी आधुनिक शिक्षणाची गंगा त्यांचापर्यंत पोहोचणेही आवश्यक आहे. शैक्षणिक सुविधा, आरोग्याच्या योजना त्यांना माहित होणे गरजेचे आहे. मातामृत्यू, बालमृत्यू रोखण्यासाठी, विविध साथींचे आजार रोखण्यासाठी आरोग्य सुविधा पोहोचविणे आवश्यक आहे. त्यांच्या श्रद्धा, अंधश्रद्धा कोणत्या आहेत ते समजून घेणे आवश्यक आहे. विकासात बाधा आणणाऱ्या अंधश्रद्धा दूर करणेही आवश्यक आहे.
  
अशा विविध अंगानी जनजाती समाजाचा अभ्यास करणे आवश्यक आहे. ज्यायोगे त्यांच्या विकासाचा विचार आपण करू शकू. त्यांची पारंपरिक, नैसर्गिक जीवनशैली जी खरी आदर्श आहे, तिची घडी न बिघडवता विकासाची गंगा त्यांच्या दारी कशी पोहोचवायची? याचा विचार करण्यासाठी, आधी या समाजाचा अभ्यास करणे, त्यांची जीवन पद्धती समजून घेणे महत्त्वाचे आहे.
 
जनजाती भागातील संशोधनासाठी मार्गदर्शक तत्वे

१. पूर्वतयारी (Pre-Field Preparation)
  • जनजाती समाजाचा इतिहास, संस्कृती, भाषा, बोलीभाषा व परंपरा यांचा अभ्यास करावा.
  • त्या प्रदेशातील भौगोलिक व सामाजिक स्थिती समजून घ्यावी.
  • शासकीय योजना, आरक्षण, आरोग्य व शिक्षणाशी संबंधित आकडेवारी] गोळा करावी.

२. प्रवेश व विश्वास संपादन (Entry & Building Trust)
  • समाजातील वडीलधारी मंडळी, ग्रामपंचायत, पारंपरिक नेते यांच्याशी आधी संवाद साधावा.
  • त्यांचा विश्वास संपादन करणे हे संशोधनाचे पहिले पाऊल असते.
  • आदराने, नम्रतेने आणि संयमाने संवाद साधणे महत्त्वाचे.

३. पद्धत (Methodology)
  • सर्वेक्षण (Survey): प्रश्नावली तयार करून माहिती संकलन करणे.
  • गटचर्चा (FGD): स्त्रिया, युवक, वृद्ध वेगवेगळ्या गटात चर्चा करणे.
  • मुलाखती (Interviews): वैयक्तिक अनुभव ऐकून घेणे.
  • निरीक्षण (Observation): शेती, नृत्य, औषधी वनस्पतींचा वापर, दैनंदिन जीवनशैली प्रत्यक्ष पाहणे.
  • लोककथा, गाणी, नृत्य, कला यांचे संकलन करून दस्तावेजीकरण करणे.

४. संवेदनशीलता (Ethical Considerations)
  • त्यांच्या संस्कृती, श्रद्धा व परंपरांचा सन्मान राखावा.
  • कोणत्याही माहितीचा गैरवापर होणार नाही याची खात्री द्यावी.
  • छायाचित्र, व्हिडिओ घेताना पूर्वपरवानगी घ्यावी.
  • माहिती गुप्त ठेवायची असेल तर गोपनीयता पाळावी.

५. अभ्यासाचे प्रमुख विषय (Key Research Areas)
  • पारंपरिक शेती व बी-बियाण्यांचे संरक्षण
  • औषधी वनस्पतींचे ज्ञान व आरोग्य पद्धती
  • शिक्षण व आरोग्य सुविधा उपलब्धता
  • मातामृत्यू, बालमृत्यू, पोषणस्थिती
  • भाषा, बोली, लोककथा, नृत्य, कला
  • श्रद्धा, अंधश्रद्धा व त्यांचा सामाजिक जीवनावर परिणाम
  • शासकीय योजनांचा लाभ व परिणाम

६. माहितीची मांडणी (Documentation & Analysis)
  • आकडेवारी, अनुभव, निरीक्षणे यांचे व्यवस्थित नोंद व विश्लेषण करावे.
  • नोंदी करताना त्यांच्या भाषेतील म्हणी, उदाहरणे जतन करावीत.
  • संशोधन निष्कर्ष सादर करताना समाजाच्या विकासाला पूरक सूचना द्याव्यात.
७. परतावा (Feedback to the Community)
  • संशोधन संपल्यानंतर त्यांचे निष्कर्ष स्थानिक भाषेत, सोप्या शब्दांत त्या समाजाला सांगावेत.
  • यामुळे समाजाला आदर वाटतो व भविष्यातील संशोधनाला सहकार्य मिळते.

एक वाक्यात सांगायचे तर:
“जनजाती भागातील संशोधन म्हणजे माहिती गोळा करण्याइतकेच, त्या समाजाच्या विश्वास, संस्कृती आणि जीवनशैलीचा सन्मान राखत विकासाचा मार्ग शोधण्याची प्रक्रिया आहे.”